केंद्र शासनाच्या राष्ट्रीय कृषि बाजार (E-NAM) योजनेअंतर्गत शेतमालास रास्त भाव मिळणेकरीता येवला कृषि उत्पन्न बाजार समिती मध्ये महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळ, पुणे यांचे मार्गदर्शनाने ई-नाम योजनेची अंमलबजावणी सुरु आहे. कांदा, मका व भुसारधान्य इ. सर्व शेतीमालाची ऑनलाईन गेट एंट्री करण्यात येत असून कांदा या शेतीमालासह सर्वच शेतीमालाचे ई- ऑक्शन करण्यात येत आहे.
राष्ट्रीय कृषि बाजार योजनेअंतर्गत केंद्र शासनाकडून येवला बाजार समितीस १० संगणक संच, १० युपीएस, ४९ इंची एल.ई.डी. टी. व्ही., ४ लेझर प्रिंटर, २ टॅब व २ वेब कॅमेरे इ. साहित्य मिळालेले असून बाजार समितीने आवश्यक त्या ठिकाणी सदर साहित्याची उभारणी केलेली आहे. तसेच इंटरनेट कनेक्शनसाठी एअरटेल यांचेकडून ५० एमबीपीएस ची लिज्ड लाईन घेण्यात आलेली असून त्याव्दारे शेतीमालाचे ऑनलाईन लिलाव करण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे शेतमालाची गुणवत्ता तपासणी करणेसाठी प्रयोगशाळेची (असेईंग लॅब) उभारणी करण्यात आलेली असून त्याठिकाणी मका व भुसारधान्य शेतमालाची गुणवत्ता तपासणी करण्यात येत आहे.
माहे एप्रिल २०२५ अखेर ई-नाम योजनेअंतर्गत ४५४५८१ लॉटची १२४२३३५८.३१ क्विंटलची गेट एंट्री करण्यात आलेली असून ५७३२२ लॉटचे १५८५१३१.१७ क्विंटलचे ऑनलाईन लिलाव करण्यात आलेले आहेत. तसेच २११९३ लॉटची गुणवत्ता तपासणी करण्यात आलेली असून ५८३ लॉटचे रु. २,५२,८१,२५३/- इतक्या रकमेचे ई-पेमेंट करण्यात आलेले आहे. त्याचप्रमाणे ई-नाम पोर्टलवर ४५०५३ शेतक-यांची नोंदणी करण्यात आलेली आहे.